Pune : खोटे दिव्यांगत्व दाखवणाऱ्यांवर गंडांतर

पुणे – आंतरजिल्हा बदलीतून सवलत मिळण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणीस ससून रुग्णालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता बदलीतून सूट मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या बदल्यांसह जिल्ह्यात कार्यरत सर्वच शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
या सर्व कागदपत्रांची फेरपडताळणी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामार्फत केली जाणार असल्याने बोगस कागदपत्रे सादर केलेले शिक्षक अडचणीत येणार आहेत. जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे.
मात्र, यापैकी अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गंभीर दखल घेऊन शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिला होते. त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी ससून रुग्णालयाला पत्र पाठवून ४०९ दिव्यांग शिक्षकांची यादी दिली होती.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, दिव्यांगत्वाची फेरपडताळणी करण्यास ससून रुग्णालयाने शक्य नसल्याचे कळविले आहे. यापूर्वी फक्त आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.
आता मात्र जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यात कार्यरत दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची यादी तयार करण्याचे निर्देश दिले असून, ही यादी जे. जे. रुग्णालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
ससून रग्णालयाचा नकार
ससून रुग्णालयात गंभीर,अतिगंभीर रुग्णांची दाखल संख्या प्रचंड आहे. न्यायालय, पोलीस विभागाकडून अनेक आरोपी वैद्यकीय तपासणीसह उपचारांसाठी पाठविण्यात येतात. तातडीची रुग्णसेवा, न्यायवैद्यकीय आणि वैद्यकीय प्रकरणे, दिव्यांग प्रमाणपत्रे अशा अनेक प्रकारची सेवा या रुग्णालयातून दिली जाते. रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने दिव्यांगत्वाची फेरपडताळणी करणे अशक्य असल्याचे ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेला कळविले आहे.
बोगस प्रमाणपत्रास चाप
जिल्ह्यात एकूण दिव्यांग शिक्षकांची संख्या किती आहे, हे अद्याप निश्चित नाही. सर्व यादी मिळाल्यानंतर आणि फेरतपासणीनंतरच खरी संख्या समोर येणार आहे. बदली टाळण्यासाठी सादर केलेल्या शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. बदलीसाठी आतापर्यंत ४०९ शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे.





