Pune: मुक्कामी दिंड्यांना सुविधा देणार; महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पुणे – वारी सोहळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यांसाठी महापालिकेकडून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीच्या भागात स्वच्छता तसेच पाणी पुरवठा केला जातो. आता यावर्षी शहरातील ज्या सार्वजनिक मंडळांच्या परिसरात दिंड्या उतरतील तसेच ज्या ठिकाणी नाश्ता तसेच जेवणाची सुविधा असेल त्या ठिकाणीही स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि पाणी पुरवठयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात दि. ३० जूनला दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांंनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांंसह दोन्ही पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासह या काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
ही कामे केली जाणार
– पालखी मार्गावर स्वच्छता
– पावसाळा असल्याने सर्वत्र औषध फवारणी
– सर्व परिसराची २४ तास स्वच्छता
– मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे
– ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी आराम कक्ष उभारणे
– मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी
– मोबाइल टॉयलेट्स उभारणे
– इमर्जन्सी मेडिकल युनिट उभारणे
– रस्त्यालगतच्या सिमाभिंती स्वच्छ करणे
– पेठांंमध्ये २४ तास पाणीपुरवठा करणे
– दिंडी मुक्कामी शाळांची स्वच्छता करणे
– मुक्कामाच्या ठिकाणी शेड उभारणे





