Pune Accident : शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडल्याने महिलेचा मृत्यु

पुणे – गावाहून पुण्यात आलेली 60 वर्षीय महिला स्वच्छतागृहातुन एसटी स्थानकात परत येत होती. त्याचवेळी एसटी स्थानकामध्ये पाठीमागे येणाऱ्या शिवशाही बसच्या पाठीमागील चाकाखाली महिला आल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. हि घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन येथील एसटी स्थानक परिसरात घडली.
गेंदाबाई ज्ञानोबा चौगुले (वय 60, रा. केगाव, सोलापुर) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. भानुदास वाडकर (रा. लातुर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी राणी इगवे (वय 35) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेंदाबाई यांचा भाऊ मोशीमध्ये राहतो. तो काही दिवसांपासून आजारी असल्याने त्या आपल्या भावाला भेटण्यासाठी पुण्याला आल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी राणी व काही नातेवाईक होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते सोलापुरहून पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकात आले होते. त्यानंतर त्यांना मोशी येथे भावाकडे जायचे होते.
एसटीतुन उतरल्यानंतर गेंदाबाई एसटी स्थानकातील स्वच्छतागृहात गेल्या. तेथून त्या माघारी येत असताना भरधाव शिवशाही बस (एमएच 06, एस.9485) एसटी स्थानकात आली. तेव्हा गेंदाबाई या शिवशाही बसच्या पाठीमागून एसटी स्थानकात बसलेल्या मुलीकडे जात होत्या. तेवढ्यात भरधाव पुढे गेलेली शिवशाही बस अचानक तितक्याच वेगात पाठीमागे आली. त्याचवेळी गेंदाबाई या बसच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.




