Pune Accident: चांदणी चौकात भिषण अपघात; एसटीच्या मालवाहू बसची सिमेंट मिक्सरसह वाहनांना धडक

पुणे – चांदणी चौकात भिषण अपघातचांदणी चौकातून कोथरुडच्या दिशेने येणाऱ्या एसटीच्या मालवाहू बसने वेगाने रस्ता ओलांडताना एका सिमेंट मिक्सरसह काही वाहनांना धडक दिली. या भिषण अपघातात एका महिलेसह चौघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. यामुळे काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, चांदणी चौकातील उतारावरुन राज्य परिवहन महामंडळाची महाकार्गो बस रस्ता ओलांडून विरुध्द दिशेला अनेक वाहनांना धडकली. त्यामध्ये काही जण जखमी झाले. यामध्ये एका सिमेंट मिक्स ट्रकलाही बस धडकली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत जखमींना मदत केली. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. यातील एम गंभीर जखमी आहेत.
दरम्यान, घटना पहाणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, बस इतकी वेगात होती, की चालकाचे नियंत्रण उतारावरुन सुटून ती रस्ता दुभाजक तोडत पलिकडच्या बाजूला गेली. तेथे ३ ते ४ दुचाकींना धडकत सिमेंट मिक्सर ट्रकवर आदळली. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन वर्दळीच्या वेळी हा अपघात घडला.
या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. चार व्यक्ती जखमी झाल्या असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तरीही आणखी कोणी जखमी इतर कोणत्या रुग्णालयात दाखल आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे.
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त





