Pune Accident: नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात; सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करने वाहनांना उडविले, दोघे जखमी
Pune Accident: अपघातात कारमधील चालक चरणदास लक्ष्मण आकटे ( 64,रा. हरपुडे देवरुख, रत्नागिरी), सिमेंट बल्कर चालक आदृश्यप्पा गुरू सिद्दप्पा मस्तीहोली (35,रा.बेलगम कर्नाटक) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Accident: मुबंई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटची वाहतूक करणाऱ्या बल्करने दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरूवारी (दि.05) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याच्या पुढे असलेल्या पेट्रोलपंपानजीक घडला आहे.
अपघातात कारमधील चालक चरणदास लक्ष्मण आकटे ( 64,रा. हरपुडे देवरुख, रत्नागिरी), सिमेंट बल्कर चालक आदृश्यप्पा गुरू सिद्दप्पा मस्तीहोली (35,रा.बेलगम कर्नाटक) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, आंबेगाव पोलिस ठाण्यात सिमेंट बल्कर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत बोलताना आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले, सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर ट्रकने दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास पुणे बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांना पाठीमागून धडक दिली. सिमेंट वाहतूक करणारा हा बल्कर साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर निघाला होता. कात्रज बोगद्याच्यापुढे उतारावर येथील एका पेट्रोलपंपासमोर त्याने वाहनांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर तो दुरीपुरावर थांबला. अपघातात कारमधील चालक अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला बाहेर काढून नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करमधील चालक सुद्धा जखमी झाला असून, त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.





