pune : पसायदानाच्या स्वरांतून विश्वशांतीचा संदेश
pune :

देश-विदेशातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
pune : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या पुण्यातील मुक्कामादरम्यान महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून पुणे प्रथम-सेवावारी २०२६ उपक्रमांतर्गत आयोजित सामूहिक पसायदान पठणाला देश-विदेशातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भवानी पेठ येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी मुक्कामस्थळ तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामस्थळी शुक्रवारी रात्री नऊ वाजता सामूहिक पसायदानाचे पठण करण्यात आले.
आता विश्वात्मके देवे ! या पसायदानाच्या स्वरांनी परिसर भक्तिमय झाला. प्रत्यक्ष उपस्थित वारकऱ्यांसह डिजिटल माध्यमातून पुणे, महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील भाविकांनी विश्वशांती, मानवता आणि सर्वांच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते गणेश बिडकर, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त माधव जगताप, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी प्रमुख राजेंद्र उमाप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा संदेश देणारे आहे. ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’च्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून वारकरी संप्रदायातील समता, सेवा, भक्ती आणि विश्वबंधुत्वाचा विचार जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.





