शहरातील पालिकेची क्षेत्रीय कार्यालये गर्दीने ओसांडली पुणे : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा अधिकृत एबी फाॅर्म मिळालेल्या इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन पर्यंतची मुदत असल्याने उमेदवारांनी दुचाकी रॅली, पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन करत निवडणूक कार्यालय गाठले. अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्याने कार्यालयांत मोठी गर्दी झाली होती. आसपासच्या परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य पक्षाचे उमेदवार आज शेवटच्या दिवशी अर्ज भरणार असल्याने निवडणूक यंत्रणेवर ताण निर्माण झाला. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एक-दोन तास शिल्लक असताना पक्षाने एबी फॉर्म दिले. त्यामुळे फाॅर्म येण्याची वाट बघत असलेल्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी आधीच क्षेत्रीय कार्यालयात गर्दी केली असल्याचे पहायला मिळाले. पोलिसांची तारांबळ क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी अचानक उमेदवारी भरण्यासाठी आलेल्या इच्छुकांची गर्दी वाढल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांना बाहेर काढत उमेदवारांच्या सोबत असलेले कुटूंबातील सदस्य अथवा एकदोन कार्यकर्त्यांना आत सोडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार दाखल होत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागत होती. निवडणूक कार्यालयात शहरातील कोणत्या प्रभागात कोणाला उमेदवारी मिळाली आहे, प्रमुख पक्षांनी कोणाची उमेदवारी कापली आहे, बंडखोरी कोणी केली आहे याची चर्चा रंगली होती. सोमवारी पक्षाचा एबी फाॅर्म मिळाल्यानंतर अनेकांनी अर्ज दाखल केलेले नव्हते. त्या उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले. सोमवारपर्यंत अपक्ष तसेच तिकिट मिळेल, या भरवशावर अर्ज दाखल केलेल्या इतर राजकीय पक्षांतील उमेदवारांकडून मंगळवारी पुन्हा एबी फाॅर्मसह नव्याने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काही उमेदवारांकडून चार ते पाच अर्ज दाखल करण्यात आले आहे.