Pune : ॲग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत ८५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

पुणे : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अॅग्रीस्टॅक या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रासाठी आतापर्यंत राज्यातील सुमारे 85 लाख शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. दरम्यान राज्यात 1 कोटी 40 लाख शेतकरी आहेत. त्यानुसार उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी लवकरच टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यावर महसूल विभागाने भर दिला आहे.
राज्यात महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या वतीने अॅग्रीस्टॅक हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी डिजिटल ओळखपत्र (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रकल्पातून नोंदणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याची पूर्ण माहिती असणार आहे, तसेच त्यांची शेतजमीन, पीक पद्धती, आर्थिक विवरण, यांसह शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती जमा करण्यात येत आहे.
त्यातून शेतकऱ्यांचे ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, हमीभाव, अनुदान, पीक विमा यांसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.





