पुण्यात 5 कोटींचे घबाड सापडल्याप्रकरणी गाडीच्या मालकाने दिली, पहिली प्रतिक्रिया, म्हणाला,’माझा काहीही संबंध नाही…’

Pune 5 Crore Cash Seized Update । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे- सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर रोकड घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी (दि.२१) सायंकाळी ताब्यात घेतले. वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मात्र, या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. 5 कोटींची ही रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालली होती? याबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी कोणतीही माहिती देण्यास तयार नाही.
याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. ‘मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटीचा हा पहिला हप्ता…काय बापू… किती हे खोके?,’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानावर आता शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझा याप्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते.
ज्या गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम सापडली ती गाडी अमोल नलावडे या व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता याप्रकरणी अमोल नलावडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी माझी काहीही चूक नाही, असे नलावडे यांनी म्हटले आहे.
Pune 5 Crore Cash Seized Update । माध्यमांशी बोलतांना अमोल नलावडे नेमकं काय म्हणाले…
“या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी मी काही महिन्यांपूर्वीच बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला पोलीस स्टेशन किंवा इतर कोणाचाही अजून तरी फोन आलेला नाही.’
ते पुढे म्हणाले,’माझी काही चूक नाही. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाईन पैसे घेतले. त्यामुळे मला काही अडचण येईल असे वाटत नाही. आम्ही काही वर्षांपूर्वी शेकापचे काम करायचो. मात्र आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही” असेही गाडीचे अगोदरचे मालक अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.





