Pune : ४६ वर्षीय कॅब ड्रायव्हरने दिले चार जणांना जीवदान

पुणे : वडगाव शेरी येथील रहिवासी असलेल्या ४६ वर्षीय कॅब चालकाने अवयवदान करून चार जणांना जीवदान दिले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असे कुटुंब आहे.
आठ एप्रिल रोजी पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांचे वडील, पत्नी आणि मुलीने अवयवदानासाठी संमती दिली.
त्यांच्या दोन्ही किडनी, यकृत आणि हृदय दान करण्यात आले. झेडटीसीसी, पुणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार या अवयवांचे वाटप करण्यात आले. त्यांची एक किडनी पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ४१ वर्षांच्या महिलेला, दुसरी किडनी पुण्यातील सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये ५६ वर्षांच्या महिलेला आणि यकृत पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५७ वर्षांच्या महिलेला देण्यात आले.
तसेच त्यांचे हृदय मुंबईतील जसलोक रुग्णालयात ५४ वर्षीय महिलेला देण्यात आले. ग्रीन कॉरिडोरने दोन तासांत हृदय मुंबईत पोहोचवण्यात आले. झेडटीसीसी पुणे अंतर्गत या वर्षीचे हे २७ वे अवयवदान होते.




