Pune : अकरावीच्या राखीव कोट्यातील ३४ हजार प्रवेश निश्चित

पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत दोन दिवसात ३३ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. शुक्रवारी एका दिवसात २४ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना उद्या (दि. १४) रोजी सायं. ६ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल.
राज्यात प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यानुसार अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. अकरावीला कोट्यातून प्रवेशासाठी एकूण १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १२ जून रोजी कोट्याअंतर्गत ९ हजार ८७ ,तर शुक्रवारी २४ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
इनहाऊस कोट्याअंतर्गत १५ हजार ५५०, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ४ हजार २९, तर अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत १४ हजार १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती देण्यात आली. कोटाअंतर्गत प्रवेश ऐच्छिक असून, कोट्याद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांतून वगळण्यात येणार आहे.




