Pune : ई मुलाखतीचा ३ लाख कैद्यांना लाभ

पुणे : कारागृहात कैद्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी शासकीय सोपस्कार, प्रवासाचा खर्च अशा अनेक बाबींमुळे नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत होता. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी होणाऱ्या गर्दीत संवाद साधताना अडथळे येत होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने ई- मुलाखत ही सुविधा सुरू केली. त्यामुळे कैदी आणि त्यांच्या नातेवाईकांमधील संवाद वाढला आहे. या सुविधेचा गेल्या वर्षभरात राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या तीन लाखांहून जास्त कैद्यांनी लाभ घेतला असून, गंभीर गुन्ह्यांत कारागृहात असलेल्या ११०० परदेशी कैद्यांना नातेवाईकांशी संवाद साधता आला आहे.
राज्यातील कारागृहात कच्च्या कैद्यांची (न्यायाधीन बंदी) संख्या जास्त आहे. प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांची गर्दी होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने ‘ई-प्रिझन’ संगणकीय प्रणालीचा वापर करून ई- मुलाखत सुविधा ४ जुलै २०२३ पासून राज्यातील सर्व कारागृहांत उपलब्ध करून दिली आहे. एक जानेवारी २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यातील विविध कारागृहांत तीन लाख १६ हजार ७४७ कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ई- मुलाखत सुविधेचा लाभ घेतला असल्याचे कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पाेलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी सांगितले.
या सुविधेत नोंदणी केल्यानंतर इच्छित दिवशी कैदी आणि नातेवाईकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडते. राज्यातील सर्व कारागृहांच्या प्रवेशद्वारांसमोर या सुविधेबाबत फलक लावले आहेत. कैद्यांचे नातेवाईक, वकिलांना ई- मुलाखत नोंदणी कशी करावी, याची माहिती देण्यात आली आहे, तसेच एलईडी फलकावर मुलाखत नोंदणीची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. राज्यातील ६० कारागृहांत ही सुविधा उपलब्ध असल्याचे बुरडे यांनी स्पष्ट केले. बुरडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू आहे.
परदेशी कैद्यांच्या मानसिकेतत बदल
राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत ११०५ परदेशी कैदी आहेत. बहुतांश कैदी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा नातेवाईकांशी संवाद न झाल्याने त्यांना नैराश्य आले होते. ई- मुलाखत सुविधेमुळे त्यांचा नातेवाईकांशी संवाद सुरू झाल्याने त्यांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी सांगितले.
प्रमुख कारागृहांतील ई-मुलाखत
मध्यवर्ती कारागृह ई- मुलाखत सुुविधेचा वापर करणाऱ्या कैद्यांची संख्या
येरवडा ४५,१७४
तळोजा ४३,८४८
ठाणे ३६,३७१
मुंबई २९,३४७
नागपूर ३१,३४४
कल्याण २२,६०८
नाशिक रोड २३,८६०





