PUNE: शेअर ट्रेडिंगच्या नादात गमविले ३ कोटी ९६ लाख

पुणे – सोशल मीडियावर झालेली सायबर चोरट्याची ओळख एका निवृत्त इंजिनिअरला मोठी महागात पडली. या निवृत्त इंजिनिअरने शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ३ कोटी ९५ लाख ९५ हजार २०४ रुपये गमविले आहेत.
याप्रकरणी संतोष जनार्दन तिवारी (वय ५९, रा. लुंकड आर्किड, विमानतळ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुपवरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या दरम्यानचा काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष जनार्दन हे मॅकेनिकल इंजिनिअर असून ते खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. सायबर चोरट्याने तिवारी यांच्या फेसबुकवरून संपर्क साधला. तसेच, शेअर मार्केटमध्ये गुंतवून केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअप ग्रुप जॉइन करायला सांगितले. यानंतर ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी गुंतवून केली.
यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, तिवारी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी सेबीची भीती दाखऊन आणखी पैसे भरायला सांगितले. मात्र, पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तिवारी यांनी सायबर चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील करत आहेत.





