पुणे : जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. दक्षिण बांधकाम विभागामध्ये लाचखोरीमुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच एका लेखाधिकाऱ्याची बदली करण्यात आली. मात्र, याचवेळी दक्षिण आणि उत्तर बांधकाम विभागातील टेंडर कारकून काही ऑडीटर्स बिलिंगची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी यांच्याबाबत तक्रारी होत्या. मार्चअखेर असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया थोडी लांबणीवर टाकण्यात आली़. मात्र, तब्बल २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बजावण्यात आले.