PUNE: सव्वा लाख वर्षांत 2023 ठरले सर्वाधिक उष्ण

पुणे – नुकतेच संपलेले सन 2023 हे पृथ्वीवरील गेल्या १ लाख २५ हजार वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. याबाबतच्या निष्कर्षांना अमेरिकेतील हवामानशास्त्र विषयक अभ्यासकांनी दुजोरा दिला आहे. जागतिक तापमानवाढीचे एक-एक दुष्परिणाम दिसून येत असून, त्यात २०२३ या वर्षात जागतिक पातळीवर सलग सहा महिने अत्यंत उष्ण तापमानाची नोंद झाली आहे.
युरोपमधील कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस, यूएस एजन्सी नासा आणि नॅशनल ओशियनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन यासारख्या संस्थांचे अधिकृत अहवाल पुढील काही आठवड्यांत याबाबत घोषणा करणार आहेत, असे नासातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना सांगितले आहे.
पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक पातळीवर गेल्या शतकातील तापमानवाढीचा दर हा अत्यंत लक्षणीय राहिला आहे. लाखो वर्षांपर्यंत असे पाहण्यात आलेले नाही. आपण संपूर्ण मानव प्रजाती आपल्या ग्रहावर एक अभूतपूर्व प्रयोग करत आहोत. हवामान बदलाचे विनाशकारी परिणाम रोखण्यासाठी अजूनही वेळ आहे, पण तशी संधी मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे, असे नासाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.
एरवी वर्षभर कुडकुडणार्या युरोपमध्येही हल्ली 45 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जात आहे. गतवर्ष म्हणजेच 2023 वर्षाने तर उष्णतेचे सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत.
तापमान सतत वाढतेय
हवामान बदल आणि सध्या सुरू असलेल्या एल निनो परिस्थितीच्या एकत्रित परिणामामुळे 1850-1900 या कालावधीच्या तुलनेत ऑक्टोबर 2023अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान आधीच 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जगात हरितगृह वायूंचे प्रमाणही सतत वाढत असल्याचे निरीक्षणदेखील समोर आले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत वाढ नोंदवली गेल्याचेदेखील समोर आले आहे..





