Pune | अत्याचार प्रकरणात २० वर्ष सश्रम कारावास

पुणे – तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून गर्भवती करणाऱ्याला वडगाव मावळ न्यायालयाचे विशेष (पाॅक्सो) न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बिसोवजित मोनीलाल देबनाथ असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांच्या गावाकडील ओळखीचा फायदा घेऊन तिला फूस लावली. तसेच तिच्यावर बलात्कार करुन गर्भवती केले. किरकोळ आरोग्य तपासणीसाठी आईने मुलीला डॉक्टरकडे नेले, तेव्हा मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगले यांनी या प्रकरणात फिर्यादी, पीडित मुलगी व इतर 8 साक्षीदार यांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले. न्यायालयाने सरकारी वकिलांचे साक्षीपुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कारावासाची शिक्षा ठोठावली. तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार. तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जे नागरगोजे यांच्या याच्या मार्गदर्शनानुसार पोलीस अंमलदार अविनाश हरी गोरे यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालय मध्ये पाठपुरावा केला होता.





