pune : पुण्यात उष्माघाताचे २ तर राज्यात ३०६ रुग्ण
pune :

साडेतीन महिन्यांत राज्यभरात दहा मृत्यूंची नोंद
pune : वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढतच असून, १ मार्च ते १४ जून या साडेतीन महिन्यांत राज्यात ३०६ उष्माघाताचे रुग्ण आढळले असून, १० मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात केवळ तीन रुग्ण आढळले आहेत.
यंदा मान्सून लांबणीवर गेल्याने पावसाअभावी नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उष्माघाताने झालेल्या दहा मृत्यूंपैकी अमरावती येथे सर्वाधिक चार मृत्यू झाले आहेत. याशिवाय अकोला आणि जळगाव येथे प्रत्येकी दोन, तर लातूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात असे १९ संशयित मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये अमरावती येथे चार, नागपूर येथे तीन रुग्णांची नोंद झाली. लातूर, जळगाव, गोंदिया, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. गडचिरोली आणि सोलापूर येथे प्रत्येकी एक संशयित मृत्यू झाला आहे.
उष्माघाताच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद छत्रपती संभाजीनगर येथे झाली असून, ती ४९ इतकी आहे. नंदुरबारमध्ये २९, गडचिरोलीत २३, अमरावतीत २२ आणि नाशिकमध्ये २१ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात दोन रुग्णांची नोंद झाली आहे.
उष्माघातापेक्षा उष्णतेमुळे येणारा थकवा, चक्कर आणि निर्जलीकरणाची प्रकरणे अधिक दिसून येत आहेत. वितरण सेवा देणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे.





