पुणे @ 1838

देशात सर्वाधिक बाधितांची शहरात नोंद
पुणे – देशात सर्वाधिक करोनाबाधित पुण्यात आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 1 हजार 838 बाधितांची नव्याने नोंद झाली. शहरात सुमारे सात हजार चाचण्या घेण्यात आल्या होत्या. शहरातील बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका प्रशासनापुढील आव्हान वाढले आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांच्या संकुलातही कोविड केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्याची तयारी पालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. देशात बंगळुरू, हैदराबाद ही दोन शहरे पुण्यापाठोपाठ करोनाची “हॉटस्पॉट’ ठरली आहेत.
पुणे शहरातील बाधिताच्या वाढत्या संख्येने आतापर्यंत 35 हजार 878 चा टप्पा पार केला असून, चाचण्यांमध्येही सुमारे दोन लाखांचा टप्पा पार झाला आहे. मुंबईत करोना नियंत्रित होत असून, शनिवारी केवळ 1 हजार 138 बाधित सापडले. पुण्यात मुंबईपेक्षा अधिक बाधित सापडू लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुण्यातील करोना नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. पुण्यात पाच दिवसांचे कडक लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचा कोणताही लाभ झाल्याचे दिसत नसल्याचा निष्कर्ष बाधितांच्या वाढत्या संख्येवरून पुणेकर काढत आहेत.
शहरात अत्यवस्थ बाधितांची संख्या 547 आहे. त्यामध्ये 89 बाधितांना व्हेंटीलेटर लावण्यात आले असून, 548 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आठ दिवसात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्याही झपाट्याने वाढली असून, 13 हजार 62 इतकी झाली आहे. तर ठणठणीत बरे होऊन दिवसभरात घरी परतलेल्या बाधितांची संख्या 774 आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 881 झाली आहे. दिवसभरात करोनामुळे 18 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ससून रुग्णालयातील आठ जणांचा समावेश आहे. तर अन्य रुग्णालयात दहा जणांनी आपले प्राण गमावले.





