Pune: १५ आरोपींची कारागृहात रवानगी; ‘एल-थ्री’ बारमधील बेकायदा पार्टीप्रकरण

पुणे – फर्गसन रस्त्यावरील एल-थ्री बारमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन झाल्याप्रकरणी बार मालक-चालक, पार्टीचे आयोजक, डीजे, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि पुरवठा करणारे यांच्यासह अन्य आरोपींना सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
संतोष कामठे, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय कामठे, दिनेश मानकर, रोहन गायकवाड, मानस मल्लिक, नितीन ठोंबरे, करण मिश्रा, अभिषेक अमोल सोनावणे, ओंकार सकट, इडिको संडे, आर्यन् राजेश पाटील, अक्षय स्वामी अशी कोठडीत रवानगी झालेल्यांची नावे आहेत.
पार्टीत ड्रग्ज कुठून आणले? त्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे. अटक आणखी आरोपींची चौकशी करायची आहे. त्यामुळे तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला विरोध केला.





