Pune : दीड लाख वाहनांचे ३० मिनिटे वाचणार

पुणे : सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार) होत आहे. धायरीच्या दिशेने विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधलेला २.२ किलोमीटर लांबीचा हा पूल तब्बल दीड लाख वाहनांचा ३० मिनिटांचा प्रवास वाचवणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची आणि इंधनाची बचत होऊन पर्यावरणालाही फायदा होणार आहे.
या ठिकाणी तीन टप्प्यांत हे काम होत असून, या प्रकल्पासाठी ११८.३७ कोटी रुपये खर्च आला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये राजाराम पुलाजवळ स्वारगेटच्या दिशेने जाणारा ५२० मीटर लांबीच्या एकेरी उड्डाण पुलाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
याच मार्गावरील इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौकापर्यंतच्या १.५ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या ९० टक्के पूर्ण झाले असून, ते १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
असा होणार फायदा
– सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार.
– इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक, ब्रह्मा हॉटेल चौक आणि गोयल गंगा चौक हे पाच मोठे चौक टाळता येणार.
– ३० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत होणार.
– वेळ आणि वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होऊन प्रदूषण कमी होणार.
– पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार.





