Punawale Gun Firing : पुनावळेत थरार! प्रसिद्ध फर्निचर मॉलवर अंधाधुंद गोळीबार; बिश्नोई टोळीचं कनेक्शन उघड
Punawale Gun Firing : २ कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने बिश्नोई टोळीकडून हल्ला झाल्याचा संशय; सुदैवाने जीवितहानी टळली, गुन्हे शाखेची पथके रवाना.

Punawale Gun Firing – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील रावेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुनावळे परिसरात एका प्रसिद्ध फर्निचर मॉलवर दोन अज्ञात इसमांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने हा हल्ला करण्यात आला असून, या गोळीबाराची बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
जगदीश भेराराम बिश्नोई (वय ३४) यांनी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे-रावेत बीआरटी रोडवरील ‘ए. जे. फर्निचर मॉल’चे मालक जगदीश बिश्नोई यांचे भागीदार अशोककुमार बिश्नोई यांना दि. ७ मे २०२६ रोजी +१ (९१२) ३१०-३१०७ या क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉलद्वारे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. १५ मे २०२६ रोजी रात्री ९:१० वाजताच्या सुमारास, जेव्हा फिर्यादी मॉलच्या बाहेर बसले होते, तेव्हा एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्खोरांनी त्यांच्या दिशेने ५ ते ६ राऊंड फायर केले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावरील मॉलवर झालेला हा गोळीबार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
आरोपी निष्पन्न करणे, त्यांना शोधणे आणि त्यांना अटक करणे हे आता पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरिता रावेत पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके रवाना झाली आहेत. गोळीबाराच्या या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यामध्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. रावेत पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल कुंभार याबाबत अधिक तपास करीत आहेत.




