जुन्या दरानेच पीयुसी तपासणी

- परिवहन विभागाकडून मान्यता नाही
- निश्चित दरापेक्षा जादा आकारल्यास कारवाई
पुणे – पीयुसी तपासणी केंद्र असोसिएशनतर्फे वाहनांच्या तपासणीसाठी वाढीव दर प्रस्तावित केले आहेत. याला मान्यता न देता, जुन्या दरानेच पीयुसी तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहे. विभागाने बुधवारी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढले.
पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने येत्या 1 ऑक्टोबरपासून वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण चाचणीसाठी आकारण्यात येणारे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ दुपटीहून अधिक आहे. या दरवाढीसाठी मान्यता दिलेली नाही. याविषयी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय ससाणे यांनी परिपत्रक जाहीर केले आहे.
यानुसार, वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण चाचणीसाठी (पीयूसी) आकारण्यात येणाऱ्या शुल्कात परिवहन आयुक्तालयाच्या मान्यतेशिवाय वाढ करता येणार नाही. परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कोणी जादा दर आकारल्यास संबंधितावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.
परिवहन विभागाने 2011 मध्ये निश्चित केलेले दर
दुचाकी वाहन – 35 रुपये
तीनचाकी – 70 रुपये
चारचाकी (पेट्रोल) – 90 रुपये
चारचाकी (डिझेल) – 110 रुपये
अवजड वाहन – 110 रुपये



