लोकसभा नव्हे तर लोकसंपर्क हेच ध्येय – आ. नीलेश लंके

श्रीगोंदा – माणसं जोडणे ही माझी आवड आहे, त्याच निमित्ताने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर फिरणं होतं. माझ्या पारनेर मतदारसंघाबहेरील संपर्काचा वेगळा अर्थ काढला जात आहे. परंतु, त्यामागे माझा लोकसभा नव्हे तर लोकसंपर्क हाच उद्देश असल्याची भूमिका आमदार नीलेश लंके यांनी मांडली.
नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने येथील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना आ. लंके म्हणाले, करोना काळात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम पत्रकार आणि माध्यमांनी केले. लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कित्येक सहकारी राज्यभर काम करीत आहेत. त्याच निमित्ताने मतदारसंघाबाहेर जाणं होत. आ. लंके पुढे म्हणाले, माझे वडील श्रीगोंदेत शिक्षक होते. श्रीगोंद्याशी माझे कित्येक वर्षांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आमदार होण्याच्या आधीपासून माझा श्रीगोंद्यात संपर्क असल्याचे सांगत श्रीगोंद्याशी राजकीय नव्हे तर कित्येक लोकांशी कौटुंबिक संबंधांची नाळ जोडली गेल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
आ. लंके म्हणाले, लोकसंपर्कामागे माझा लोकसभा निवडणूक लढविण्याचा उद्देश असल्याच्या चर्चा रंगत आहेत. प्रत्यक्षात या जनसंपर्कामागे माझा कोणताही राजकीय हेतू नसून जिव्हाळ्याची माणसं जोडणे आणि ती जपणे एवढेच काम करीत असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठनेते बाबासाहेब भोस म्हणाले, आ. नीलेश लंके यांच्या करोना काळातील कार्याची प्रचिती सबंध देशाला आली. आ. लंके यांच्या रूपाने सामान्यांसाठी झटणारे नवे नेतृत्व मिळाले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय काटे, उत्तम राऊत, प्रा. संजय लाकूडझोडे, उद्योजक विजयकुमार मचे, सुभान तांबोळी आदी उपस्थित होते.




