क्षयरोग निर्मूलनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गाव पातळीपर्यंत विकेंद्रीकरण करून या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
येथील क्षयरोग अंमलबजावणी कक्षाचे (वॉर रुम) उद्घाटन डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फाउंडेशनच्या श्रीमती अनन्या आणि बीएमजीएफ फाउंडेशनचे डॉ. संदीप भारस्वाडकर, डॉ. समीर कुमटा आदी उपस्थित होते.
केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाकडे सुसज्ज अंमलबजावणी कक्ष उपलब्ध आहे. “बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ आणि “क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह’ यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. राज्यस्तरीय क्षयरोग अंमलबजावणी कक्ष (वॉर रूम) तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन आणि सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे.
या कार्यप्रमाणालीद्वारे जिल्हा आणि तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येणार असून, गुणवत्ता आणि सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. रामास्वामी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर अधिक सक्षम होणार असून, नियोजन अंमलबजावणी, शासकीय, खासगी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि संनियंत्रण पाठपुरावा यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.




