nagar | खासदार लंके यांचा शेतकऱ्यांसह जनआक्रोश

नगर, (प्रतिनिधी) – निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.५) रोजी शेतकरी जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात लंके यांच्यासह शेतकरी व कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणपतीचे दर्शन घेवून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. यावेळी शेतकरी व आंदोलनर्ते यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तसेच गाई, म्हैस व बैलगाडयांसह लाेक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या हातात शासनाच्या निषेधाचे फलक होते.
तसेच ते शासनाच्या विराेधात घोषाणाही देत होते. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे राजेंद्र फाळके,बाबासाहेब भोस, महादेव राळेभात, राजेंद्र आघाव, भगवान फुलसौंदर्, संदेश कार्ले, बाळासाहेब् बोराटे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, किरण काळे, किरण कडू,
संभाजी कदम, संदिप कर्डिले, प्रकाश पोटे, शिवशंकर, राजळे, शरदराव झोडगे, रोहिदास कर्डिले, अर्जुन भालेकर, योगीराज गाडे, रामेश्वर निमसे, डाॅ. राम कदम, संतोष पटारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकऱ्यांत दूध आणि शेतीमालाच्या हमीभावावरून प्रचंड असंतोष आहे. अनेक शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. दूध दरवाढीबाबात शासनाने कायमस्वरूपी कायदा करावा. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दूधाला ४० रुपये दर मिळावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा.
राज्यातील मंत्री शेतीमाल तसेच दुधाबाबत गंभीर नाहीत. केंद्रीय गृहमंत्री आणि दूध दरवाढीचा काय संबंध, हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला.
कांदा व दुधाला योग्य भाव देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर खा. लंके यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला.
मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. बैलगाडीतून हे सर्व नेते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. तसेच मोर्चेकऱ्यांनी समवेत जनावरे आणले, तसेच गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव वर्षभरात सातत्याने कोसळत आहेत. मंत्रीमंडळातील काही मंत्री खोटे आश्वासन व घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.
राज्यातील दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा. दूधाला ४० रुपये हमीभाव द्यावा. सरकारने दुधाला अनुदानाची घोषणा केली, परंतु जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.
पोलीस-शेतकऱ्यांमध्ये हुज्जत
आंदोलनकर्ते शेतकरी आपली जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांना आपली जनावरे आत नेऊन या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधायचे होते पण पोलिसांनी बॅरीकेट लावून हा मोर्चा अडवला.
त्यामुळे आंदोलनकर्ते चिडले व त्यांनी पोलीसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी कार्यालयात जनावरे नेवून न दिल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे बॅरीकेटलाच बांधली.
पोलिसांना वाटले दूध
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाकडून बैलगाडी अडवण्यात आली. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास नकार दिल्याने आंदोलकांनी बैलगाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच सोडली. तर यावेळी निलेश लंके यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटले.
ठिय्या आंदोलन करणार…
समाधानकारक निर्णय न झाल्यास महाविकास आघाडीचे नेते, विविध शेतकरी संघटना व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे. तसा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
दूध, कांदा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लवकर निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिला.
मंत्र्यांची वाहने सोडता तशी शेतकर्यांची बैलगाडी सोडा
मंत्र्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवात आली की लगेच गेट खोलता तशी शेतकर्यांची बैल गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडा, बैलगाडी आली की गेट बंद करता. हा कुठला न्याय आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. भाजप सरकार हे शतकरी विरोधी आहे.
त्यामुळे शेतकर्यांना अशी वागणूक दिली जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला.
अनुदानाचे गाजर न दाखवता आमच्या हक्काचे आम्हाला द्या, शेतकर्यांचा अंत पाहू नका. आम्ही मागणी करत आहोत. आमचे आम्हाला द्या, नाहितर हिसकावून घेण्याची ताकद शेतकर्यामध्ये आहे.





