पिंपरी | पालखी महामार्गावरील सार्वजनिक दिवे बंद : बिनपाण्याची शौचालये

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन केवळ कागदावर असल्याची बाब समोर आली आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पालिका हद्दीत असलेल्या पालखी महामार्गावरील सार्वजनिक दिवे बंद अवस्थेत होते.
त्यामुळे आळंदीत दाखल होणार्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर पालखी महामार्गावर ठेवलेल्या फिरत्या शौचालयांच्या वापरासाठी पाण्याची व्यवस्थाच नसल्याने वारकर्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या लाखो रुपयांची केवळ दिखाव्याकरिता महापालिका प्रशासन करत असल्याचे पहायला मिळाले.
संत तुाकारम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदनर्भात महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत अर्धा डझनपेक्षा अधिक नियोजन बैठका पार पडल्या आहेत.
या बैठकांमध्ये नियोजनाच्या संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे पालन झाले नसल्याची बाब आता समोर आली आहे. पुणे आळंदी रस्त्यावरील काळे कॉलनी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बोपखेल हा पालखी महामार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येतो.
पालखी सोहळ्यादरम्यान आळंदीत दाखल होणार्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता या रस्त्यावरील सार्वजनिक दिवाबत्तींची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मॅगझिन चौक ते चर्होली फाटादरम्यानचे सार्वजनिक दिवे बंद असल्याने आळंदीत दाखल होणार्या भाविकांना त्रास सहन करावा लागला.
पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या भाविकांच्या सोयीकरिता महापालिकेच्या वतीने काळे कॉलनी ते बोपखेल फाटादरम्यान ठराविक अंतरावर फिरत्या शौचालयांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या शौचालयांजवळ पाण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही.
त्यामुळे नागरिकांना या शैचालयाचा वापर करता आला नसल्याचे पहायला मिळाले. तर मॅगझिन चौकातील सुलभ शौचालयाजवळच आणखी फिरती शौचालये ठेवून, त्याठिकाणीदेखील पाण्याची सोय नसल्याची बाब समोर आली आहे.
ठेकेदाराला पोसायचे का ?
पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या भाविकांना पुरविल्या जाणार्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे या दोन्ही बाबींमधून दिसुन आले. त्यामुळे नियोजन बैठका केवळ कागदावरच आणि लाखो रुपयांच्या निविदा काढून केवळ ठेकेदाराला पोसण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे का ? अशी चर्चा भाविकांमध्ये होती.




