पिंपरी | जनजागृती की दिखाऊपणा ?

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी निवडणूक विभागाने मावळ लोकसभा मतदार संघात येणा-या सहा विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी जनजागृती केली.
परंतु, मतदार जनजागृती अभियानातील अधिकारी व कर्मचा-यांना यात पूर्णपणे अपयश आल्याचे सोमवारी (दि. १३) झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले. त्यामुळे जनजागृतीवर करोडो रुपयांचा झालेला खर्च पाण्यात गेल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून ५९.४५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या टक्केवारीत वाढ करण्यासाठी निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
सांस्कृतीक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, पथनाट्ये, शिबिरे घेऊन विविध घटकातील मतदारांना प्रभावित करुन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. मावळ लोकसभा मतदार संघातील चिंचवड, पिंपरी, मावळ, उरण, कर्जत आणि पनवेल या सहा विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रुग्णालये, उद्याने, भाजी मंडई, चित्रपटगृहे, गृहनिर्माण सोसायट्या एवढेच नव्हे तर मजूर अड्ड्यावर देखील मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन गर्दीच्या ठिकाणी मतदाविषयक माहितीपत्रके वाटप करण्यात आली.
नागरिकांना मतदान करण्याची शपथ देखील देण्यात आली. परंतु, घरोघरी जाऊन शंभर टक्के व्होटर स्लिपा वाटप करण्यात निवडणूक विभागाला पूर्णपणे अपयश आले.
शर्तीचे प्रयत्न करुनही यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यात निवडणूक विभागाला अपयश आले. केवळ ५४.८७ टक्के मतदान झाल्याने निवडणूक विभागाच्या मतदार जनजागृती अभियानाचा मतदारांवर कसलाही प्रभाव पडला नसल्याचे स्पष्ट झाले. याउलट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघात ५९.४५ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
तर, २०१४ च्या निवडणुकीत ५९.८९ टक्के मतदान नोंदविण्यात आले होते. याच्या तुलनेत यंदा (२०२४) मतदान टक्केवारीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. या घटत्या टक्केवारीवरुन निवडणूक विभागाच्या मतदार जनजागृती अभियानावरच संशय निर्माण झाला आहे. हे अभियान खरोखर मतदारांपर्यंत पोहचले ? की वरवर राबविण्यात आले ? असा संशय निर्माण झाला आहे.
निवडणूक विभागाचे अपयश उजेडात
मतदानाच्या अखेरच्या दिवशी मतदारांना स्लिपा मिळाल्या नसल्याची तक्रार काही मतदारांनी केली. यावरुन निवडणूक विभागाने ९० टक्के स्लिपा वाटपाचा केलेला दावा फोल ठरला. यामुळेच घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर निवडणूक विभागाने अद्याप भाष्य केलेले नाही.
तप्त उन्हाचा पारा, दुपारुन पडणारा पाऊस, सुटलेला वारा यामुळे नागरिक घराबाहेर पडले नसल्याचा निष्कर्श अधिका-यांनी मांडला होता. परंतु, मोठ्या प्रमाणात स्पिला वाटप केल्या असत्या तर मतदानाचा टक्का निश्चितच वाढला असता.
आम्हाला वेळेत स्लिपा मिळाल्या नाहीत, आम्ही मतदानाला जायचे कसे ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्याचा फटका मतदानाला बसला असून यामुळे निवडणूक विभागाचे अपयश समोर आले आहे.





