पिंपरी | पवनानगरमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची जनजागृती

पवनानगर, (वार्ताहर) – देशाचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. पवनानगर येथे अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन राष्ट्राभिमान जागृती आणि देशाच्या गौरवासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याबाबत आवाहन करण्यात आले.
पवनानगर येथील पवना विद्या मंदिर, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सरुबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज यांच्या मार्फत तिरंगा रॅली काढण्याचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा – घर घर तिरंगा, भारत माता की जय, जय जवान – जय किसान अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. शाळा ते पवनानगर बाजारपेठ अशी प्रभातफेरी काढण्यात आली.
पवना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, संकल्प स्कूलचे प्राचार्य राहुल सोनावणे, सरुबाई दळवी कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.





