पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सातारा – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात 50 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 176 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत झाले. सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
जिल्ह्यात सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर पाचशे ते सातशे मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. या केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. सातारा शहरात पाच शाळांमध्ये 23 आणि सातारा तालुक्यात 131 मतदान केंद्रे होती. ग्रामीणपेक्षा शहरी भागात मतदानाचा टक्का अधिक असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आझाद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. खा. उदयनराजे यांनी सकाळी महाराजा सयाजीराव विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. त्यावेळी त्यांचे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, कराडसह तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी 56.13 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 78.91 टक्के मतदान झाले. पाटण तालुक्यात पदवीधरसाठी 58.8 तर शिक्षकसाठी 84. 95 टक्के मतदान झाले. कराड तालुक्यात पदवीधरसाठीच्या 40 तर शिक्षक मतदारसंघात आठ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.





