PSL Franchise Sell : “IPL सोबत स्पर्धा करणं पडलं महागात!” PSL मधील संघ मालकाने सांगितलं धक्कादायक सत्य; टीम काढली विकायला
PSL Franchise Sell : क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मालक नदीम ओमर यांनी आपला संघ विकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांच्या मते कमाईच्या बाबतीत पीएसएल कधीही आयपीएलची बरोबरी करू शकणार नाही.

Quetta Gladiators Owner expresses desire to sell his PSL franchise : पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील एका प्रमुख फ्रँचायझीच्या मालकाने आपली टीम विकण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची दयनीय आर्थिक स्थिती जगासमोर आली आहे. क्रिकेट लीगमध्ये संघांची खरेदी-विक्री होणे नवीन नसले तरी, क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मालक नदीम उमर यांनी टीम विकण्यामागे सांगितलेले कारण अत्यंत धक्कादायक आहे. कमाई आणि व्यवसायाच्या बाबतीत पीएसएल कधीच आयपीएलची बरोबरी करू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे.
आता पीएसएलमधून बाहेर पडण्याची वेळ आलीय –
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नदीम उमर यांनी ही स्पर्धा आता तोट्याचा व्यवहार ठरत असल्याचे मान्य केले. योग्य प्रस्ताव आणि अटींनुसार व्यवहार झाल्यास आपण क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ विकण्यास पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नदीम उमर हे कराची शहर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संघाने आतापर्यंत चार वेळा पीएसएलची अंतिम फेरी गाठली आहे आणि एकदा विजेतेपदही पटकावले आहे.
पीसीबीच्या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका –
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२५ पासून मार्च ते मे या कालावधीत, म्हणजेच थेट आयपीएलच्या काळातच पीएसएल खेळवण्याचा निर्णय घेतला असून २०२७ मध्येही हीच वेळ कायम ठेवली आहे. नदीम उमर यांच्या मते, आयपीएलशी थेट स्पर्धा करणे ही बोर्डाची मोठी घोडचूक ठरली आहे. आयपीएलच्या झगमगाटाला भुलून त्यांनी संघ विकत घेतला होता, पण आता या स्पर्धेमुळे बोर्ड आणि संघ मालकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
Quetta Gladiators Owner, Nadeem Omar said,
“I think it is the right time for us to say goodbye to the PSL and if we get the right offer and few of our conditions are met we are prepared to sell the Quetta Gladiators franchise.
We can’t compete with the IPL or with their market. Our market is very limited compared to them. Unfortunately, we don’t have sponsors and commercial entities putting money into the PSL like it is done in the IPL.” (India Today)
— SportsGully Cricket 🏏 (@sportsgullycric) November 20, 2026
मर्यादित बाजारपेठ आणि प्रायोजकांचा अभाव –
आयपीएल आणि पीएसएलमधील उत्पन्नाची तफावत स्पष्ट करताना उमर म्हणाले की, भारताच्या तुलनेत पाकिस्तानची बाजारपेठ अत्यंत लहान आहे. आयपीएलमध्ये प्रसारण हक्क आणि तिकीट विक्रीतून कोट्यवधींची कमाई होते, मात्र पाकिस्तानमध्ये प्रायोजकांची मोठी कमतरता आहे. पीएसएलमध्ये मोठी गुंतवणूक करणारे प्रायोजकच उपलब्ध नसल्याने ही लीग आयपीएलच्या पुढे कुठेच टिकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मर्चेंडाइज विक्रीवर पायरसीची मोठी मार –
Nadeem Omar sharing the story of Quetta Gladiators 💜 https://t.co/RZW73AF7cw
— 𝐅 𝐀 𝐈 𝐙 𝐀 𝐍⚡🇵🇰 (@Faizanali_001) November 18, 2026
संघाच्या साहित्याच्या विक्रीतून होणाऱ्या नुकसानीचा पाढा वाचताना नदीम उमर यांनी पाकिस्तानमधील पायरसीच्या समस्येवर बोट ठेवले. त्यांनी आपल्या संघाच्या अधिकृत जर्सीची किंमत १,००० पाकिस्तानी रुपये ठेवली होती, परंतु स्थानिक बाजारपेठेत तिची नकली प्रत अवघ्या २०० रुपयांमध्ये विकली जाऊ लागली. या पायरसीमुळे फ्रँचायझीचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले असून, आता या लीगमधून निरोप घेणेच योग्य ठरेल असे त्यांना वाटू लागले आहे.





