PSL 2026 Controversy : PSL मध्ये अजब प्रकार! पांढरा चेंडू झाला ‘गुलाबी’, मार्नस लाबुशेनही चकित; म्हणाला, ‘करिअरमध्ये असं कधीच…’
PSL 2026 Controversy : मैदानावर पांढऱ्या चेंडूने खेळ सुरू असताना अचानक चेंडूचा रंग बदलून तो गुलाबी झाला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर फजिती झाली

PSL 2026 Ball Color Change Controversy : पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ चा पहिलाच सामना क्रिकेटमधील एका अजब आणि विचित्र वादामुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावर पांढऱ्या चेंडूने खेळ सुरू असताना अचानक चेंडूचा रंग बदलून तो गुलाबी झाला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर फजिती झाली.
गद्दाफी स्टेडियमवर लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात खेळल्या गेलेल्या पीएसएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात ही घटना घडली. सामना सुरू असताना पांढऱ्या चेंडूचा रंग हळूहळू बदलू लागला, ज्यामुळे खेळाडू आणि पंचही गोंधळात पडले. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून आश्चर्य व्यक्त केले आहे.
चेंडूला लागला जर्सीचा रंग !
🚨🚨Marnus Labuschagne on the change of ball color
“I did say to the umpires after the second over, What’s going on? The ball is red, it must be from the clothes or something like that. I’ve never seen anything like pic.twitter.com/VHSXouHZYx
— SheR•ALI (@Sher__Ali) March 26, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हैदराबाद किंग्समेनच्या खेळाडूंनी चेंडू चमकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या जर्सीचा रंग (डाई) चेंडूला लागला. दुसऱ्या ओव्हरनंतर चेंडूचा रंग गुलाबी आणि नंतर फिकट लाल झाला. लाबुशेनने ही समस्या तात्काळ ओळखून पंचांकडे धाव घेतली. त्याने सांगितलं की, “दुसऱ्या ओव्हरनंतर मी पंचांना विचारलं, हे काय चाललंय? चेंडू तर लाल झाला आहे. ते म्हणाले कदाचित कपड्यांच्या रंगामुळे हे घडलं असावं. पण मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये असं काहीही कधीच पाहिलं नाही.”
सामन्यात लाहोर कलंदर्सने मारली बाजी –
या विचित्र वादानंतरही सामना सुरू राहिला. लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. फखर झमानने ३९ चेंडूत ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली. प्रत्युत्तरात हैदराबाद किंग्समेनचा संघ २० ओव्हरमध्ये केवळ १३० धावाच करू शकला. परिणामी, लाहोर कलंदर्सने ६९ धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला.
पाकिस्तानमधील इंधन संकट आणि रिकाम्या स्टेडियमनंतर आता निकृष्ट दर्जाच्या जर्सीमुळे चेंडूचा रंग बदलल्याने पीसीबीवर सोशल मीडियाच्या माध्यामातून जोरदार टीका होत आहे.





