सातारा – माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, त्यांच्या अटकेची विधानसभेत मागणी केली होती. त्यानंतर आ. चव्हाण यांना अज्ञात व्यक्तीकडून मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा जिल्हा कॉंग्रेस कमिटीने निषेध केला आहे. धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक करुन सरकारने पृथ्वीराज चव्हाण यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व सरचिटणीस नरेश देसाई यांनी केली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भिडे गुरुजींनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. याप्रकरणी भिडे यांना अटक करावी, अशी आक्रमक मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आ. चव्हाण यांना रविवारी ईमेलद्वारे अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. याचा सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
आ. चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभेत विरोधक अधिक आक्रमक झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची दखल घेऊन, या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. एरवी शांत, संयमी असलेले आ. चव्हाण यांचा आक्रमक पवित्रा प्रथमच पाहायला मिळाला. त्यानंतर ईमेल द्वारे त्यांना धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करावी. आ. चव्हाण यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी. येत्या दोन दिवसांत संबंधिताला अटक न झाल्यास जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. जाधव आणि देसाई यांनी दिला आहे.