पुणे | दिंड्यांसाठी शाळा मोफत उपलब्ध करून द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर पालखी – माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची मागणी- माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची मागणीसोहळ्यासोबत शेकडो दिंड्या पुणे मुक्कामी असतात. या दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी महापालिकेच्या सर्व शाळा मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पालखी कालावधीत शहरात केवळ भवानीपेठ परिसरातील शाळाच वारकरी दिंड्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. तर उर्वरित शहरात दिंड्यांना जागा हवी असल्यास महापालिका शाळांचे भाडे आकारते. त्यामुळे अनेकांना दिंड्यांची सेवा करता येत नाही. यंदा शहरात दि. ३० जून व १ जुलै या दोन दिवशी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील.
महापालिका दरवर्षी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या शाळा दिंडयांसाठी मोफत खुल्या करते. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण शहराच्या वेगवेगळया भागात दिंड्या उतरतात. त्या ठिकाणी अनेक पुणेकर त्यांच्या जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था करतात. पालखी काळात पावसाळा लक्षात घेता, मध्यवर्ती भाग वगळता शहरात इतर भागात येणाऱ्या दिंडयांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अनेक शाळांकडे विचारणा केली असता, त्या दिवसाचे भाडे भरावे असे प्रशासन सांगत आहे. त्यामुळे महापालिकेने मध्यवर्ती पेठांप्रमाणेच शहराच्या इतर भागातील शाळा दिंड्यांसाठी मोफत खुल्या केल्यास वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे या बाबत निर्णय घ्यावा, असे सुतार यांनी म्हटले आहे.





