पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दंत उपचाराच्या पूर्ण सुविधा मिळत नाहीत. दंत रुग्णांची केवळ तपासणी केली जाते. पुढील आवश्यक असणार्या उपचारासाठी रुग्णांना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. तचा नाहक भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात दंत उपचार उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी यलाप्पा वालदोर यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वायसीएममध्य दररोज कमीत कमी 50-60 रुग्ण केवळ दंत उपचारसाठी येत असतात. मात्र याठिकाणी दातांच्या तपासणीसाठी एक्स-रे व ओपीजी एक्स -रे मशिन उपलब्ध नाहीत. मुख्य दंत-तज्ज्ञ येथे उपलब्ध नाहीत.अपुरी सुविधा, सक्षम यंत्रणा नसल्यामुळे त्या गरजू-गरीब रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात आहे. त्याचा आर्थिक भूर्दंड शहरातील या रुग्णांना सहन करावा लागत आहे. खाजगी रुग्णालयात यावर उपचार होतात; परंतु श्रीमंत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मात्र यावर उपचार का केले जात नाहीत, असा सवाल वालदोर यांनी उपस्थित केला आहे.