Nagar : बिबट्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करा

जामखेड : गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यातील साकत घाटात व मोहा या ठिकाणी वावर दिसून येत आहे. शेतकऱ्यांना ज्वारी पीकाला पाणी सोडण्यासाठी रात्रीचे जावे लागते. त्यामुळे रात्रीएवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी केली आहे.
सोमवार दि.९ रोजी रात्री भुतवडा तलावाजवळ एका गाईची बिबट्याने शिकार केली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुका हा ज्वारी या पिकासाठी प्रसिद्ध आहे.
त्यामुळे ज्वारी पीक हे सर्वत्र आहे. शेतकऱ्यांना ज्वारी पीकाला पाणी सोडण्यासाठी रात्रीचे जावे लागते. त्यामुळे जामखेड तालुक्यातील वाड्या-वस्त्यावरील गाव व परिसरातील वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा विद्युत पुरवठा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होणार नाही.
याची प्रशासनाने दखल घ्यावी व तातडीने संबंधित वनविभाग व अजून इतर विभागांना पाचारण करून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन स्वप्नील खाडे यांनी तहसीलदार यांना दिले.





