अभिमानास्पद ! जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी बनली नेव्ही ऑफिसर

जळगाव : अनेकजण एखाद्या क्षेत्रात यश मिळत नाही म्हणून परिस्थितीला दोष देतात. याउलट काहीजण परिस्थितीशी दोन हात करत आहे त्या स्थितिचा सामना करतात आणि यशस्वी होतात. कष्ट करणाऱ्यासमोर नशीबही झुकत असं म्हणतात ते उगाच नाही. नुकतंच याचाच प्रत्यय जळगावमधील एका तरुणाने सर्वांना दाखवून दिला. परिस्थिती गरीब असूनही थांबून न राहता वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हीने घरच्यांच्या साथीने आणि स्वतःच्या कष्टाने नेव्ही अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे.
वैष्णवीची घरची परिस्थिती जेमतेम, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडील ज्ञानेश्वर पाटील रिक्षा चालवतात. असं असल तरी वडिलांनी मुलीला क्षिक्षणासाठी काहीही कमी पडू दिल नाही. वैष्णवीने देखील घरच्यांचा विश्वास सार्थ ठरवत नेव्हीमध्ये अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. वैष्णवीचे कुटुंब बोदवड तालुक्यातील चिखली गावामध्ये राहतात.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थिती नसताना देखील वैष्णवीने नेव्हीमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. परीक्षेला हैद्राबाद येथे जाण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसेही नव्हते अशा वेळेस आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरे जात कुटुंबीयांनी असलेली पॉलिसी मोडून पैसे जमवले आणि मुलीला परीक्षेसाठी पाठवले. मुलगी अधिकारी झाल्याचे समजताच वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले.
वैष्णवी नेव्हीमध्ये अधिकारी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. नातेवाईकांसह सोशल मीडियावर देखील वैष्णवीच्या या यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.



