निदर्शक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना दाखवले काळे झेंडे

अंबाला – अंबाला शहराच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना आज शेतकऱ्यांच्या उग्र निदर्शनांचा सामना करावा लागला. तेथील शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून भाजप सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांचा निषेध नोंदवला.
काही शेतकरी निदर्शकांनी खट्टर यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात येते. निदर्शकांनी खट्टर यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीहीं केली. अंबाला शहरातील महापौर निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधीत करण्यासाठी मुख्यमंत्री आज या शहरात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा ज्या हिस्सार-अंबाला रस्त्यावरून जाणार होता तो महामार्गही शेतकरी आंदोलकांनी आज काही काळ रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. हरियाणातील शेतकऱ्यांनी या आधीही भाजपचे एक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना येथे काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला होता.





