उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलन; नरेश मस्केंनी साधला आंदोलनकर्त्यांशी संवाद, नेमकं प्रकरण काय?

ठाणेः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर येथील एका कंपनीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. येथील सुपरमॅक्स कंपनीतील कामगार त्यांच्या विविध समस्यांबाबत आंदोलन करत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर मोर्चा नेत ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. हातात पोस्टर घेऊन कामगार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनाचा माहिती शिवसेनेचे नेते नरेश मस्के यांनी मिळताची त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट संवाद साधला. मात्र, आंदोलक कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणातील तीन हात नाक्याशेजारी सुपरमॅक्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांना त्यांचा पगार दिलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून कंपनी बंद पडलेली आहे. यामुळे पगार मिळावा यासाठी या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे यांनी तुमची देणे दिली जातील, असे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्यापर्यंत कामगारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. यामुळे आंदोलकांनी मल्होत्रा फॅमिली तुपाशी, कामगार उपाशी…अशा आशयाचे पोस्टर घेऊन शिंदेंच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे.
प्रकरण काय?
सुपरमॅक्स कंपनीने या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोणतेही कारण न सांगता थेट कामावरून काढून टाकले, आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. तसेच जुलै २०२२ पासून कंपनीने कामगारांना त्यांचे पगार दिलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांची आहे. घटनास्थळी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के जात त्यां्नी आंदोलकांशी चर्चा करत संवाद साधला. यावेळी त्यांनी हा विषय कोर्टात असल्याचे सांगत ते आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.





