अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टीनच्या समर्थनासाठी आंदोलन; 282 विद्यार्थ्यांना अटक

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी पॅलेस्टीनच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे हा जगभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. आंदोलकांना अटकाव करण्याची काम न्यूयॉर्क पोलीस करत असून काल रात्रभरात त्यांनी २८२ विद्यार्थ्यांना अटक केल्याची बातमी आहे. त्यानंतर ज्यूइश व्हॉइस फॉर पीस या स्थानिक संघटनेने पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे.
हिंसाचार होण्याची शक्यता असल्यामुळेच पोलिसांना बोलावण्यात आले होते असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हटले आहे. तर काल रात्री विद्यापीठात ज्या काही घटना घडल्या त्यानंतर आमच्याकडे कोणताच पर्याय राहीला नव्हता असे विद्यापीठाचे अध्यक्ष मिनोचे शफिक यांनी म्हटले आहे.
इस्त्रायलकडून गाझावर हल्ले सुरूच असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू केले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये ३३ हजारपेक्षा जास्त माणसे मारली गेली असल्याचा अनुमान आहे. दरम्यान, कोलंबिया विद्यापीठात आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याचे लोण अमेरिकेच्या अन्य विद्यापीठांमध्ये पोहोचले आहे. सगळीकडे बंद आणि निदर्शने केली जात आहेत. इस्त्रायलने गाझावरील बॉम्ब हल्ले ताबडतोब थांबवावेत ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.





