खालापूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. एका कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जाहीर सभेत कानाखाली मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा निषेध करत खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत या गटनेचा निषेध व्यक्त केला. सोमवारी (दि. ४) खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन सादर केले. जिंतूर तालूक्यातील बोरी येथील लाभार्थी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात अवमानकारक, असभ्य आणि धमकीच्या स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने सोमवारी (दि. ४) राज्यभर काळी फित लावून कामबंद आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खालापूरमधील अधिकाऱ्यांनीही तीव्र निषेध व्यक्त करत, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील, प्रशांत कदम, संदीप धारणे, महेश म्हसे, परेश नागरे, वैभव पाटील, आकाश पाटील, सुहास वारे, निलेश म्हसकर, प्रवीण पेमारे, गणेश मोरे, प्रमोद काळे, पंकज जाधव, योगेश पाटील, सुरज मुकादम, विश्वास वारे, स्नेहल गोसलकर, मंगला केदारे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिकारी अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनामार्फत या योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान प्राप्त झाला आहे. मात्र मंत्री महोदय ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अवमानकारक वागणुक देतात. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या मंत्री महोदयांवर कारवाई झालीच पाहिजे. – प्रमोद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी