Satara | वीज कंत्राटी कामगार संघटनेचे महावितरण कार्यालयसमोर आंदोलन

कृष्णानगर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र वीजकंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने मंगळवारी कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयसमोर आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन केले.
महानिर्मिती महापारेषण महावितरण या कंपनीत 42000 कंत्राटी कामगार काम करत आहते. मात्र, त्यांची भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यामार्फत संगनमताने पिळवणूक होत आहे.
यामध्ये प्रामुख्याने आर्थिक मोबदला व्यवस्थित न मिळणे .अधिकाऱ्यांची विनाकारण मर्जी सांभाळणे तसेच पगारातील ठराविक रक्कम खंडणी स्वरूपात ठेकेदारास द्यावी लागत आहे न दिल्यास सदर कामगारास कामावरून कमी करणे किंवा अति दूर भागात बदली करणे अशा प्रकारची धमकीची टांगती तलवार या कंत्राटी कामगारावर लटकत असते.
ही हुकूमशाही कायमस्वरूपी मोडण्यासाठी संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर 12 ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्यात वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे. शेवटी 24 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा वीज मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर उपोषण होणार आहे.
यावेळी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल व होणाऱ्या नुकसानास सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे देण्यात आला आहे.





