पेन्शनसाठी माजी सैनिकांचे कचेरीसमोर धरणे

नगर -माजी सैनिकांना वन रॅक, वन पेन्शन योग्य दराने दिली गेली पाहिजे. आमच्या आणि अधिकारी वर्गाच्या पेन्शनमध्ये खूप तफावत असून ती दूर झाली पाहिजे. मिलिटरी सर्विस पे (पगार) सर्व रॅंकचा एकच असला पाहिजे, अशा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिक, त्रिदल संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
दिल्ली जंतर मंतर येथे सर्व जीसीओ व जवान हे आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व त्रिदल माजी सैनिक संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यासाठी नगर मुख्यालयाचे त्रिदलचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे, आरोग्य अध्यक्ष युनूस टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी मोर्चा काढत काढून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, नगर शहर अध्यक्ष प्रकाश पारकाळे, सचिव सतीश घुमरे, खजिनदार रामदास पालवे, संचालक शांतीलाल पवार, पाथर्डी तालुका अध्यक्ष गोवर्धन गरजे, जामखेडचे अध्यक्ष लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, अण्णासाहेब सांगळे, रवींद्र रासकर, धर्मनाथ पालवे, हरिभाऊ चिरके, नेवासा तालुकाध्यक्ष अशोक राजळे, आदींसह जिल्ह्यातून माजी सैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आंधळे म्हणाले, मिलिटरी सर्विस पे (पगार) सर्व रॅंकचा एकच असला पाहिजे, तसेच पगारामध्ये ज्या त्रुटी व तफावत केंद्र सरकारने दूर करून मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा सहकुटुंब सहपरिवार माजी सैनिकांच्या वतीने देशात मोठे आंदोलन करण्यात येइल असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.





