शिरूर बसस्थानकातील समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन; भाजपा महिला आघाडीचा इशारा

शिरूर – शिरूर बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवासी, वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले, ओबीसी शहराध्यक्षा सुशीला गोसावी, नितु शर्मा, सुषमा फंड, राजेंद्र महाजन, प्रितेश फुलडाळे उपस्थित होते.
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पाणपोई असूनही पाणी नाही, फलाटावर बस वेळेवर लागत नाहीत, बस वारंवार बंद पडतात, अचानक रद्द होतात, स्वच्छतागृहात अस्वच्छता आणि पैसे मागितले जातात, रस्त्यावर खड्डे आणि नादुरुस्त बस उभ्या आहेत, महिलांच्या सुरक्षेसाठी एकच होमगार्ड असून दोन पोलिसांची गरज आहे, अशा समस्या आहेत. या गैरसोयी दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे.
भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड आणि बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्यासह परिसराची पाहणी करून समस्या दाखवल्या आणि निवेदन सादर केले.





