पुरंदर लाठीचार्जचा निषेध: काँग्रेस, शेतकरी संघटनांचा नेवासा तहसीलवर संतप्त मोर्चा

नेवासा : पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या क्रूर लाठीचार्जच्या निषेधार्थ नेवासा तहसीलवर काँग्रेस आणि विविध शेतकरी संघटनांनी संतप्त मोर्चा काढला. महायुती सरकारच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या लाठीचार्जमध्ये एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला, तर शेकडो शेतकरी जखमी झाले.
पुरंदरमधील सात गावांनी विमानतळासाठी जमीन देण्यास ठाम विरोध केला आहे. एकतपूर येथे ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी शांततापूर्ण आंदोलनाद्वारे विरोध दर्शवला. मात्र, पोलिसांनी अश्रुधुर आणि लाठीचार्ज करत आंदोलन चिरडले. या घटनेचा राज्यभर निषेध होत आहे. नेवासा मोर्चात काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांनी सरकारवर हिटलरशाहीचा आरोप करत शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले.
शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, गणपत मोरे, अशोकराव काळे यांनी सरकारला धडा शिकवण्याचा इशारा दिला. मोर्चात अण्णासाहेब पटारे, ऍड. सागर सागडे, गुलाबभाई पठाण, युसूफ शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले. तहसीलदार संजय बिरादार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.





