विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध

पुणे – धुळे येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या राज्य सरकारचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने गुडलक चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला.
आज विद्यार्थीविरोधात आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारी घटना घडली आहे. धुळे येथे सामान्य विद्यार्थ्यांवर धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीचा हल्ला “अभाविप’ कधीच सहन करणार नाही. या घटनेस जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे व त्यावर न्याय मागणे हा कोणता गुन्हा आहे? परीक्षा शुल्क परत मागितले तर विद्यार्थ्यांचे काय चुकले? विद्यार्थ्यांवर केलेली ही कार्यवाही कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. हे आंदोलन करत असताना पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याविरोधात आमदार सुनील कांबळे यांनी डेक्कन पोलीस स्टेशन येथे उपोषणाला बसले होते. या सर्व घटनेचा “अभाविप’ पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे यांनी निषेध व्यक्त केला.





