Protein Rich Roti: भारतीय घरांमध्ये जेवणाच्या ताटात चपाती हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. गव्हाची चपाती जवळपास प्रत्येक घरात रोज खाल्ली जाते. मात्र, फक्त गव्हाच्या चपातीमुळे शरीराच्या सर्व पोषण गरजा पूर्ण होत नाहीत. अशावेळी थोडा बदल करून हीच साधी चपाती अधिक पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त बनवता येते. तज्ज्ञांच्या मते, चपातीच्या पिठात काही खास पदार्थ मिसळल्यास तिचं पोषणमूल्य अनेक पटींनी वाढू शकतं. त्यामुळे चव आणि आरोग्य दोन्ही सांभाळता येतात. प्रोटीन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी मिसळाव्यात? गव्हाच्या पिठात सोयाबीनचं पीठ मिसळणं हा एक उत्तम पर्याय आहे. सोयाबीनमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. यामुळे शरीराला आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. त्याचप्रमाणे बेसन म्हणजेच हरभऱ्याचं पीठही प्रोटीनने समृद्ध असतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात. रागीचं पीठ सुद्धा सध्या खूप लोकप्रिय होत आहे. रागीमध्ये प्रोटीनसोबत कॅल्शियम आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे हाडं मजबूत राहतात आणि रक्ताची पातळी सुधारते. तसेच, क्विनोआ हे सुपरफूड मानलं जातं. त्याचं पीठ मिसळल्यास शरीराला आवश्यक सर्व अमिनो अॅसिड्स मिळतात. Wheat Roti बिया आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करा (Protein Rich Roti) फक्त धान्यच नाही, तर काही बिया आणि सुका मेवाही चपाती अधिक हेल्दी बनवू शकतात. चिया बिया, अळशी आणि भोपळ्याच्या बिया यांना बारीक करून पिठात मिसळल्यास प्रोटीनसोबतच ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबर मिळतं. यामुळे हृदय निरोगी राहतं आणि पचनक्रिया सुधारते. बदाम आणि शेंगदाण्यांची पावडरही चपातीमध्ये मिसळता येतो. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळींचाही करा वापर पारंपरिक पद्धतीने डाळींचा वापर करूनही चपाती अधिक पौष्टिक बनवता येते. मूग डाळ, हरभरा डाळ किंवा उडीद डाळ हलक भाजून त्याची पावडर तयार करून पिठात मिसळा. यामुळे चपातीची चव अधिक छान लागते आणि प्रोटीनची मात्रा वाढते. याशिवाय, चपाती ऐवजी तुम्ही पनीर, डाळ किंवा अंकुरित धान्य भरून पराठेही तयार करू शकता. हे चविष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही असतात. दैनंदिन आहारात छोटासा बदल करून तुम्ही तुमच्या शरीराला अधिक पोषण देऊ शकता. साध्या गव्हाच्या चपातीला प्रोटीनयुक्त बनवणं खूप सोपं आहे. योग्य घटकांचा वापर केल्यास तुमचं जेवण अधिक हेल्दी आणि संतुलित होऊ शकतं. ( Protein Rich Roti)