पुणे | मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आयोगाकडे प्रस्ताव

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक कामकाजादरम्यान जिल्ह्यातील ३४ कर्मचाऱ्यांना अत्यवस्थ वाटल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक कामकाजासाठी ४५ हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त होते. जिल्हा प्रशासनाकडून २०० रुग्णालयांसोबत रोकडविरहित (कॅशलेस) उपचारासाठी करार करण्यात आला होता.
आतापर्यंत ३४ कर्मचाऱ्यांना कामकाजादरम्यान त्रास झाला. संबंधितांना तातडीने विविध रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांचा मात्र मृत्यू झाला. एक व्यक्ती शिक्षक, तर दूसरी व्यक्ती ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा जवान आहे. सीएपीएफ जवानाच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता.
त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शासकीय इतमामात कोलकाता येथे पाठवून देण्यात आले, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.





