ईडीकडून 395 कोटींची प्रॉपर्टी जप्त

नवी दिल्ली – सक्त वसुली विभागाने म्हणजेच ईडीने राजस्थानातील एका सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणात संबंधीतांवर छापे टाकून 395 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या सोसायटीने 20 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत आदर्श ग्रुप ऑफ कंपनी, सिद्धी ग्रुप, आणि त्यांच्याशी संबंधीत लोकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत शेती, निवासी व व्यवसायीक गाळे, यांचा समावेश असून या मालमत्ता राजस्थान, हरियाणा, आणि दिल्ली परिासरात आहेत.
या संबंधीतांची बॅंकांतील गुंतवणूकही गोठवण्यात आली आहे. या सगळ्याची एकूण किंमत 395 कोटी 94 लाख रूपये इतकी आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.
मुकेश मोदी, राहुल मोदी आणि अन्य लोकांनी स्थापन केलेल्या आदर्श क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कारभारात हा गैरव्यवहार झाला आहे. यात सोसायटीच्या प्रमोटरनेच गुंतणुकदारांची रक्कम हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे.



