नवी दिल्ली – ईडीने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह इतरांवर मोठी कारवाई केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नोकरी घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्याच्याशी संबंधित सहा कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने कथित रेल्वे नोकऱ्या-जमीन घोटाळ्यात आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद, यांचे कुटुंब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. एजन्सीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जारी केला आहे.
या प्रकरणी ईडीने लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुली मीसा भारती, चंदा यादव आणि रागिणी यादव आणि त्यांच्या मुलांचे गेल्या काही महिन्यांत जबाब नोंदवले होते. कथित घोटाळा लालू यूपीए-1 सरकारमध्ये रेल्वेमंत्री असतानाचा आहे.
ईडी आणि सीबीआयचा आरोप आहे की 2004-09 दरम्यान भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये ग्रुप-डी पदांवर विविध व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या बदल्यात संबंधित व्यक्तींनी त्यांची जमीन लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांना हस्तांतरित केली होती.