Pimpri | प्रचार तोफा थंडावल्या, वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

मावळ, (प्रतिनिधी) – निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तास अगोदर कुठल्याही प्रकारचा प्रचार करणे बंदी असल्याने सोमवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजता मावळातील सर्व उमेदवारांकडून प्रचाराची सांगता करण्यात आली. त्यानंतर मात्र वैयक्तिक गाठीभेटी वाढल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले.
एकीकडे निवडणूक प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरु असताना दुसरीकडे उमेदवाराचे कार्यकर्ते देखील बुथ स्तरावरील गाठीभेटी घेऊन मतदानाच्या दिवसाचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी कार्यकर्ते देखील नियोजन करताना दिसून आले. तसेच छुप्या प्रकारचा प्रचारही पाहायला मिळाला.
रात्री उशीरापर्यंत वाहनांची वर्दळ आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमुळे मावळ मतदारसंघातील प्रचार मतदानाच्या अंतिम दिवसापर्यंत होत असल्याचे चित्र बघायला मिळाले.





